छावा : विकी कौशलचा ‘छावा’ हा चित्रपट पाहण्याचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. 14 फेब्रुवारी रोजी प्रदर्शित झालेल्या या ऐतिहासिक चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धडाकेबाज कामगिरी करत तब्बल 200 कोटी रुपयांचा टप्पा पार केला आहे.
छत्रपती संभाजी महाराजांच्या पराक्रमाची गाथा पुन्हा एकदा जगासमोर मांडणाऱ्या या चित्रपटाला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. चित्रपटाचा ट्रेलर आणि टीझर प्रदर्शित झाल्यापासूनच , आणि प्रदर्शना नंतर पहिल्याच दिवसापासून थिएटरमध्ये गर्दी उसळली.
मध्यप्रदेश सरकारने ‘छावा’ केला करमुक्त
चित्रपट पाहणाऱ्या प्रेक्षकांसाठी आनंदाची आणखी एक बातमी म्हणजे मध्यप्रदेश सरकारने ‘छावा’ चित्रपटाला टॅक्स फ्री (करमुक्त) करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री मोहन यादव यांनी छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या निमित्ताने हा निर्णय जाहीर केला.
छत्रपति शिवाजी महाराज जी की जयंती के अवसर पर उनके पुत्र संभाजी महाराज पर आधारित हिन्दी फिल्म 'छावा' को टैक्स फ्री करने की घोषणा करता हूं… pic.twitter.com/b6dm1sDH7P
— Dr Mohan Yadav (@DrMohanYadav51) February 19, 2025
त्यांनी म्हटले,
“छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या सुपुत्र छत्रपती संभाजी महाराजांवर आधारित ‘छावा’ या चित्रपटाला आम्ही मध्यप्रदेशात करमुक्त करत आहोत.”
महाराष्ट्र सरकारचीही सकारात्मक भूमिका
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील यासंदर्भात प्रतिक्रिया दिली आहे.
ते म्हणाले,
“छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर एक उत्तम चित्रपट बनवण्यात आला आहे, ही आनंदाची गोष्ट आहे. मी अद्याप चित्रपट पाहिलेला नाही, पण इतिहासाची छेडछाड न करता तो बनवण्यात आल्याचे मला कळले आहे. हा चित्रपट अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावा यासाठी आम्ही आणखी काय करू शकतो, यावर विचार करत आहोत.”
फडणवीस यांनी हेही स्पष्ट केले की 2017 पूर्वीच महाराष्ट्रात मनोरंजन कर हटवण्यात आला आहे, त्यामुळे राज्यात स्वतंत्र करमुक्त करण्याची गरज नाही.
‘छावा’ची ऐतिहासिक बॉक्स ऑफिस कामगिरी
6 दिवसांत तब्बल 197.75 कोटींची घसघशीत कमाई करणाऱ्या ‘छावा’ने आता 200 कोटींचा टप्पा पार केला आहे.
‘छावा’ या चित्रपटात विकी कौशलने छत्रपती संभाजी महाराज, रश्मिका मंदानाने महाराणी येसूबाई, तर अक्षय खन्नाने औरंगजेब यांची भूमिका साकारली आहे. चित्रपटातील प्रत्येक भूमिकेला रसिकांकडून मोठी दाद मिळत आहे.
‘छावा’ पाहण्यासाठी आता आणखी एक कारण!
मध्यप्रदेशमध्ये करमुक्त झाल्यामुळे आता प्रेक्षकांना तिकीटासाठी कमी पैसे मोजावे लागणार आहेत. त्यामुळे तुम्ही अद्याप हा चित्रपट पाहिला नसेल, तर हा ऐतिहासिक सिनेमा थिएटरमध्ये जाऊन अनुभवण्याची ही योग्य वेळ आहे!